अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून वाहन काढावे लागत आहे. त्यामुळे राजकमल चौकातून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने आठवडाभरापासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
बँका, कपडा मार्केटसह विविध वस्तूंची शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून जयस्तंभ चौक ओळखला जातो. या मार्गावरील गर्दी पाहता शासनाने उड्डाणपुलाचीदेखील निर्मिती केली आहे. मात्र, आता रस्ता सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून वनवे मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कामात अडथळा येऊ नये म्हणून राजकमल चौक ते जयस्तंभकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदचे फलक लागलेले असतानाही वाहतूक सुरूच आहे. एवढेच नव्हे तर वाहतूक पोलीसदेखील इमानेइतबारे कर्तव्य बजावताना दिसून आले. सद्यस्थितीत या मार्गावरून जाताना वाहनधारकांना चालू स्थितीत वाहने थांबवून ठेवावी लागत आहे. त्यामुळे विनाकारण पेट्रोल जाळावे लागत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांनी लोकमतजवळ व्यक्त केल्यात.
बॉक्स
पेट्रोलपंप अडगळीत
वर्दळीच्या या मार्गावर अनेक दिवसांपासून अगदी कमी जागेत पेट्रोलपंप असल्याने अधिकच गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अशा स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेही पेट्रोलपंप मोकळ्या जागेत असायला हवे, तेथे प्रसाधनगृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे नियम असताना जयस्तंभ चौकातील हे पेट्रोलपंप वाहतुकीस अडथळा ठरत आहे. चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ राहिल्यामुळे ठिणगी उडाल्यास किंवा पार्किंगमुळे आगी लागल्यास मोठी हानी टाळता येऊ शकणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांच्या आहेत.