अपघात वाढले : नो-पार्किंग झोनच्या अधिसूचनेचा फज्जाअमरावती : रॉग साईड वाहतूकीमुळे वाहनचालकांना दररोज राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. याविरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांसोबतच वाहनाचालकांचे वादविवाद वाढले आहे. उड्डाणपुलाचा परिसर नो-पार्किंग झोन असतानाही या अधिसूचनेचा फज्जा वाहनचालक उडवीत आहे. हा प्रकार सर्रारपणे सुरू असतानाही वाहतूक पोलिसांनी निगरगट्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्या वाढीप्रमाणेच दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात जिकडेतिकडे वाहनांची वर्दळ सुरु असताना वाहन चालक बेभान होऊन वाहतूक नियमांचे सर्रार उल्लंघन करीत आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. मात्र, शहरातील वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजला आहे. राजकमल व राजापेठ हे दोन्ही चौक शहरातील मुख्य वाहतुकीचे केंद्र असून याच ठिकाणी सर्वाधिक अस्तव्यस्त वाहतुकीचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच राजापेठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे काही मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे. एकतर्फी मार्ग सुरुकेल्यानंतरही वाहन चालक कोणालाही न जुमानता सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहे. राजापेठकडून बडनेरा जाणाऱ्या मार्गाने वाहन चालविण्यास नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कुशल आॅटोसमोरील वळण मार्गाने वाहनचालक थेट आपली वाहन राजापेठ रेल्वे क्रॉन्सिंगकडे आणत असल्यामुळे राजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहे. विरुध्द दिशेने ही वाहने भारतीय महाविद्यालयाकडून रेल्वे कॉन्सिंगकडे येत असल्यामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातही घडत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असतानाही पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई न करण्याचा जणू संकल्पच घेतला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या निगरगट्ट भुमिकेमुळे सर्वसामान्य जननेचा जीव टांगणीवर आला आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर हातगाडी चालकांचेही अतिक्रमणराजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक तर होतेच. त्यातच रस्त्यावरील हातगाडी चालकांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. भारतीय महाविद्यालयात दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे विद्यार्थी भरधाव वेगाने वाहन विरुध्द दिशेने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. ही बाब वाहन चालकांसाठी घातक ठरणारी असून एखाद्या मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
राँग साईड वाहतुकीमुळे राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम’
By admin | Published: February 13, 2017 12:06 AM