लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अत्यंत वर्दळीच्या पंचवटी ते कठोरा नाका रस्त्यावर सिमेंटीकरण तसेच तोकडी वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.शहरातील पंचवटी ते कठोरा नाका मार्गालगत शाळा, महाविद्यालये व दवाखान्यांसह शासकीय कार्यालये असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू राहते. त्यातही काही भागात रस्ता सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गाने वाहतूक होत आहे. यू-टर्न लांब असल्याने वाहनधारक विरुद्ध दिशेने वाहने दामटतात. परिणामी, या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना विमान चालविण्याइतपत सजग राहावे लागतात. मध्येच वाहने ये-जा करीत असताना नजरचूक झाल्यास सेकंदात अपघात घडल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती या मार्गाची झाली आहे. पोलीस यंत्रणा नियोजित ठिकाणी तैनात असली तरी संपूर्ण रस्त्यावर त्यांची नजर राहीलच, असे नाही. त्यामुळे येथील स्थिती पाहता वाहतूक यंत्रणा अत्यंत सजग ठेवणे गरजेचे झाले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्यादेखील वाढत असून, शहरातील अल्पवयीन मुले स्टंटबाजी करीत बेभान वाहने दामटताना दिसत आहे. अशांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात आहेत; तथापि यासंदर्भात मोहीमसुद्धा राबविण्यात येत आहे. मात्र, मुले चौकात शांतपणे वाहने चालवितात आणि चौकातून पुढे निघताना अचानक अॅक्सिलिटर वाढवून इतरांचे लक्ष विचलित करून तत्क्षण पोलिसांजवळून पळूून जातात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालणे कठीण झालेले आहे.विदेशी वाहतूक प्रणाली येथे राबविणे अगत्याचेअमेरिका, मलेशिया, शिंगापौर, फ्रांससह आदी देशांत वाहतुकीचे नियम फार कडक आहेत. प्रत्येक मार्गावर प्रती शंभर मीटर अंतरावर पथदिव्यांसह सीसीटीव्ही लावलेले आहेत. वाहनांचा वेग मर्यादित केलेला आहे. ज्या वाहनधारकाने नियमाचे उल्लंघन केले, तो त्या भागातील सीसीटीव्हीत कैद होताच आरटीओतून त्या क्रमांकाच्या वाहनधारकाच्या नावे तसा दंड आकारण्यात येतो. त्यासंबंधित मेसेजदेखील सदर वाहनधारकाच्या मोबाईलवर फ्लॅश होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिक त्या त्या देशातील नियमांचे आपुलकीने पालन करतो. परिणामी विदेशात वाहतूक पोलीस चौकाचौकांत उन्ह, वारा सहन करीत उघड्यावर कर्तव्य बजावत नाहीत. यासाठी यंत्रणा बसविली आहे. मात्र, ज्या ठिकाणी हे घडत असेल तेथील माहिती तत्क्षण कन्ट्रोल रुममध्ये पोहचते आणि जवळील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होतो. वाहतुकीचे सर्व नियम वाहनधारकांना आपसुकच पाळावे लागतात. ती प्रणाली आपल्या देशात विकसित झाल्यास अवैध वाहतुकीसह इतर गुन्ह्यांना लगाम लागेल व अपघाताच्या घटना टळतील. त्यामुळे हे होणे अगत्याचे आहे.
पंचवटी ते कठोरा नाका रस्त्यावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:25 PM
शहरातील अत्यंत वर्दळीच्या पंचवटी ते कठोरा नाका रस्त्यावर सिमेंटीकरण तसेच तोकडी वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देयंत्रणा तोकडी : नागरिकांचे असहकार्य, सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन