प्रकृतीत सुधारणा : प्रकरण हप्तेखोर पोलिसांच्या अंगलटअमरावती : दर्यापूर येथील काळी-पिवळीचालकाला येथील वाहतूक पोलिसांनीच मारहाण केल्यामुळे त्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. एस. मकानदार यांनी अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे यांना दिला आहे. त्यामुळे हप्तेखोर पोलिसांच्या हे प्रकरण अंगलट येणार आहे. चालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. दर्यापुरात अनेक महिन्यांपासून अवैध वाहतूक सुरू असून पोलिसांचे हप्ते बांधल्याचे वृत यापूर्वी लोकमतने पुराव्यानिशी प्रकाशित केले होते. संतोष गंगाधर टोळे (२५) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे. संतोष हा दर्यापूर -अकोट मार्गावर स्वतमालकीची काळी-पिवळी चालवितो. प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना पोलिसांनी हप्ता मागितल्याचा आरोप संतोषने केला होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दीड हजार रुपये मागतिले व पैसे न दिल्यामुळे काळी-पिवळी ठाण्यात जमा केली. नंतर पट्ट्याने मारहाण केली. याचा मनावर परिणाम झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी पैसे मागितले का? अनेक काली-पिवळी धारकांचेही वाहतूक पोलिसांशी लागेबांधे आहेत काय, यासंदर्भात संबंधितांचे बयाण नोंदविले जाईल. याकरिता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)हा घ्या पुरावाअनेक दिवसांपासून अवैध वाहतूक फोफावली आहे. पोलिसच या हप्तेखोरीला कारणाभूत आहेत. पोलिसांना हप्ता दिला नाही. म्हणून चालकाला वाहतूक पोलिसांना मारहाण केली. त्याने विष प्राशान केल्याची घटना ताजीच असताना अवैध वाहतूक सुरु झाली. शनिवारी 'लोकमत'ने घेतलेले हे जिवंत छायात्रित असून एसपी साहेब, हा घ्या पुरावा व संबंधित पोलिसांवर कारवार्इंचा बडगा उगारा, अशी मागणी होत आहे. पोलिसांवर कारवाई केव्हा ? काली-पिवळी चालकाला बेदम मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी संतोषच्या नातेवाईकांनी केली आहे. वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच काली-पिवळीचालक दारू प्यायला व त्यानेच पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे चालकाविरुद्धच पोलिसांनी कलम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चुकीचे असल्याची भावना निर्माण झाली होती.या प्रकरणात नेमके काय झाले? कोण दोषी आहे, याची चौकशी करण्यात येणार आहे. अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. चार दिवासांत त्याचा अहवाल सादर झाल्यानंतरच कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. - एमएस मकानदार, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती
'त्या' वाहतूक पोलिसांची चौकशी
By admin | Published: August 21, 2016 12:04 AM