फोटो - सावंगी ०४ ओ
वरूड/सावंगी : तालुक्यातील सावंगी गावात जाणाऱ्या रस्त्यावर नरखेड-अमरावती रेल्वे मार्गाचा अंडरपास शुक्रवारच्या पावसामुळे बंद झाला. यात चार ते पाच फूट पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीसह मालवाहू वाहनेसुद्धा अडकली होती . याबाबत ग्रामपंचायतीने बांधकाम विभागासह रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन तातडीने पत्र दिले.
पुसला ते गणेशपूर मार्गावर सावंगी जोडरस्ता असून या रस्त्यावर नरखेड अमरावती रेल्वे मार्ग आहे. सावंगी रस्त्यावर रेल्वे पूल आहे. या रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर चार ते पाच फूट पाणी साचते. यामुळे बैलबंडीसह दुचाकी, चारचाकी तसेच ट्रकसह आदी वाहने अडकून पडतात. पावसाळ्यात वाहतूक बंद होते. शेतकऱ्यांसह नागरिकांचा संपर्क तुटतो. अनेक वेळा बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाला तक्रारी करूनसुद्धा नाली बांधलेली नाही. शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुलाखाली पाणी साचल्याने वाहने अडकून पडली होती. याबाबत ग्रामपंचायतीने वरूड येथील बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, वरूड रेल्वे स्थानक प्रशासन, खासदार, आमदार यांना पत्र देऊन तातडीने नाली तयार करून पाण्याचा निचरा करण्याची अशी मागणी सरपंच सपना मस्की, उपसरपंच अनिल जिचकार, ग्रामसेवक एस.ए. गजभिये, सदस्य मनीष पाबळे, पवन जिचकार, शुभांगी ठवरे, राहुल शेळके, राणी गुहे, अर्चना कुरवाळे, रूपाली चोरे, मीना जिचकार यांनी केली आहे.