(शामकांत सहस्त्र भोजने)
बडनेरा: मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचा ठणठणाट आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे प्रवाशांनी खबरदारी म्हणून प्रवास करणे टाळले आहे. मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये प्रवाशांची संख्या बऱ्यापैकी आहे. काही गाड्या रद्ददेखील झाल्या आहेत. कोरोनामुळे बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. कोरोनाचा कहर संपूर्ण राज्यात प्रचंड वाढला आहे. राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी जाहीर केली. याच दरम्यान परराज्यातील अमरावती जिल्ह्यात असणारे कामगार त्यांच्या गृहजिल्ह्यात परत जात आहे. लांब पल्ल्याच्या गीतांजली एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, आझाद हिंद, हावडा मेल, गांधीधाम-पुरी आदी इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून पडते आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रामुख्याने अमरावती-मुंबई, विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस अमरावती-पुणे या गाड्यांमध्ये प्रवाशांचा ठणठणाट आहे. विदर्भातील प्रवासी मुंबई-पुण्याकडे जाणे टाळतो आहे. तर बाहेरील प्रवासीदेखील येत नसल्याने रिकाम्या रेल्वेगाड्यावरून दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील रेल्वे गाड्यांवर झालेला आहे. काचीकुडा -नरखेड व अमरावती- सुरत या गाड्यांना मोजकेच प्रवासी आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावरून मोठ्या संख्येत इतरत्र रेल्वे गाड्या धावतात मोठा प्रवासी वर्ग येथून प्रवास करीत असतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोना संसर्ग चांगलाच पसरला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमधील प्रवासी असतो. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये, या भीतीपोटी महाराष्ट्रातील रेल्वे गाड्या रिकाम्याच धावत असल्याचे चित्र आहे. दिवाळीपासून प्रवाशांची गर्दी वाढली होती. मात्र दुसऱ्या लाटेने रेल्वेगाड्यांच्या प्रवासी संख्येत प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठी घट झाल्याचे दिसून पडते आहे.
---------------
बॉक्स
बडनेरा रेल्वे स्थानकावर शुकशुकाट
गेल्या महिन्याभरापासून संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच त्रस्त करून सोडले. दिवाळीनंतर पहिल्या लाटेचा प्रभाव ओसरला होता. रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली होती. मात्र दुसऱ्या लाटेने बऱ्याच रेल्वे गाड्या रिकाम्या धावत आहे. बडनेरा तसेच अमरावती रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा कोरोनामुळे शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. लवकरात लवकर संसर्ग कमी झाला पाहिजे. रेल्वे गाड्यांमधून प्रवास करता यावा, यासाठी अनेक प्रवासी प्रतीक्षेत आहेत.