अमरावती : पल्स पोलिओ व कोविड लसीकरण मोहीमसंदर्भात आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी व सर्व पी.एच.एन. यांचे प्रशिक्षण बुधवारी घेण्यात आले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी एस. आर. ठोसर यांनी याविषयी प्रशिक्षण दिले.
महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड काळात चांगले कार्य केले आहे. लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी साठवणूक व्यवस्था व ट्रान्सपोर्ट मॅप तयार करण्यात यावा. आपले काम हे नियोजनबध्द व सरकारच्या नियमावलीनुसार झाल्यास धावपळ होणार नाही. यासाठी पूर्वनियोजन करणे अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात अजून जोमाने काम करून या लसीकरण मोहीम उत्कृष्टरीत्या राबवून कोरोना विरुध्दचे जनआंदोलन यशस्वी करू, असे आयुक्त म्हणाले. यावेळी डॉ. ठोसर यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बुथचे व गृहभेटी देणाऱ्या टीमच्या नियोजनाविषयी सुचना केल्या.
कोवीडची लस काही कालावधीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक ते मनुष्यबळ व लसीकरण सत्र घेण्यासाठी योग्य त्या जागा शोधण्याचे काम कसे करावे त्याचप्रमाणे लसीचा साठा करण्याबाबत व लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या सभेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, विक्रांत राजुरकर, जयश्री नांदुरकर, शहरी आरोग्य केंद्राचे सर्व स्त्री वैद्यकीय अधिकारी, पी.एच.एन. मेडिकल ऑफिसर, स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.