अमरावती : कोरोना काळात विशेष रेल्वे सुरू असताना पुणे, मुंबई मार्गे ये-जा करणाऱ्या गाड्यांत मेपर्यंत आरक्षण हाऊसफुल्ल आहे. विशेषत: मुंबई, पुणे मार्गे जाण्यासाठी गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर- पुणे गरीब रथ, तर अमरावती - मुंबई अंबा एक्स्प्रेेसला सर्वाधिक पसंती आहे.
रेल्वे विभागाने १५ मार्च ते ९ जून या कालावधीत विशेष रेल्वे गाड्या पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काेरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना लांब पल्ल्याच्या गाड्या जूनपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. परिणामी प्रवाशांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्यांचे गणित जुळवित रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले आहे. अमरावती- मुंबई, गोंदिया -मुंबई विदर्भ एक्सप्रेस ही मेपर्यंत हाऊसफुल्ल असल्याचे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस या लांब पल्ल्याचा या गाड्यांमध्येही आरक्षण मिळेनासे झाले आहे. हावडा-मुंबई सुपर डिलक्समध्येही आरक्षण नाही. नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर -पुणे गरीबरथ या गाड्यांनाही प्रवाशांची पसंती आहे. सध्या मुंबई, पुणे येथे कोरोना झपाट्याने वाढत असताना प्रवाशांची संख्याही वाढत आहे. आरक्षणासाठी अतिरिक्त पैसे माेजावे लागत असले तरी रेल्वे गाड्यात गर्दी कायम असल्याची माहिती आहे.