अमरावती : येथील उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक संजय जगताप यांची कोकण विभागात पनवेल येथे बदली करण्यात आली आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सोमवार, ९ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहे. जगताप यांची पाच महिन्यांतच बदली झाल्याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व अमरावती अशा पाच जिल्ह्यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची धुरा सांभाळणा-या पदावर गत दोन वर्षांपासून कायमस्वरूपी सहसंचालक मिळत नसल्याची ओरड आहे. यापूर्वी अशोक कळंबे आणि आता संजय जगताप यांची बदली करण्यात आली आहे. जगताप यांचा कार्यभार अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील केशव तुपे यांच्याकडे १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सोपविण्यात आला आहे.
राज्यातील नऊ सहसंचालकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही बदली न करता, त्यांना ११ नोव्हेंबर २०१९ पर्यंत तात्पुरता व अतिरिक्त कारभार सोपविला आहे. यात अजय साळी (सोलापूर), विजय नारखेडे (पुणे), बळीराम लहाने (नांदेड), अर्चना नेरकर (नागपूर), रोहिदास काळे (मुंबई), सतीश देशपांडे (औरंगाबाद व जळगाव) यांचा समावेश आहे. पणवेल येथील राजेंद्र धामणस्कर यांना सोलापूरचा, तर अमरावती येथील संजय जगताप यांना पणवेलचा तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार सोपविण्यात आला आहे.
प्राचार्य फोरमची एसीबीकडे तक्रारसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठीय प्राचार्य फोरमचे अध्यक्ष आर.डी. सिकची यांनी सहसंचालक संजय जगताप यांच्याविरुद्ध २ सप्टेंबर रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. अनुदानित महाविद्यालयांत शिक्षक भरती, सातवा वेतन आयोग आणि शिक्षकांची वेतननिश्चिती व पदोन्नतीसाठी पैशांचा व्यवहार होत असल्याचे तक्रारीत नमूद होते, हे विशेष.