अमरावती : आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांची अचानक प्रशासकीय कारणास्तव दीड वर्षातच यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाला वानखेडे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आणि स्टे देखील मिळविला. मात्र, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित दाैऱ्यावर येताच दोन दिवसांनी ‘एटीसीं’ची बदली होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (एटीसी) यांचा कारभार १२ जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. धारणी, पांढरकवडा, संभाजीनगर, कळमनुरी, किनवट, पुसद आणि अकोला या सात एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा कारभार चालतो. ‘ट्रायबल’मध्ये साधारणत: तीन वर्षांनी प्रमुख धिकाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु, एटीसी सुरेश वानखेडे यांची बदली दीड वर्षातच करण्यात आली. त्यांच्या जागी अमरावतीला ‘एटीसी’पदी सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. तथापि, वानखेडे यांनी बदली आदेशाला स्थगनादेश मिळविल्याने अमरावती एटीसीपदी ‘जैसे थे’ स्थिती आहे. तर शुक्रवार, २१ एप्रिल रोजी चंचल पाटील यांनी एटीसींचा पदभार स्वीकारला आणि तासाभरातच अमरावतीहून साताराकडे रवाना झाल्याची माहिती आहे. शासन आदेशाला स्टे मिळाल्याने सुरेश वानखेडे हे एटीसीपदी कायम आहेत. मात्र, ‘ट्रायबल’च्या अमरावती अपर आयुक्त पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ अद्याप संपलेला नाही, असे चित्र आहे.वानखेडेंच्या बदली मागे मास्टरमाईंड कोण?अमरावतीचे एटीसी सुरेश वानखेडे यांचा कार्यकाळ संपायला अद्यापही दीड वर्षाचा कालावधी आहे. तरीही १९ एप्रिल २०२३ रोजी बदली का झाली? याचे उत्तर वानखेडे यांना मिळू शकले नाही. त्यामुळे बदली आदेशाविरूद्ध वानखेडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणकडे (मॅट) धाव घेतली. तर दुसरीकडे नव्या अपर आयुक्त चंचल पाटील यांनी ‘मॅट’ मध्ये कॅव्हेट दाखल केले होते. पण, शुक्रवारी ‘मॅट’ने वानखेडे यांच्या बदली आदेशाला स्टे दिल्यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे एटीसीपदाच्या खुर्चीचे वास्तव आहे. वानखेडे यांची तडकाफडकी बदली करण्यामागे मास्टरमाईंट कोण? याविषयी जोरदारचर्चा रंगू लागली आहे.