अमरावती : महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील एकुण १९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागाने २८ जून रोजी सकाळी निर्गमित केले. त्यात पवार यांच्या बदली व नव्या पदस्थापनेचा समावेश आहे. मात्र, त्याचवेळी अमरावती महानगरपालिकेचे नव्या आयुक्तांबाबत आदेश काढण्यात आलेला नाही. पवार यांच्या बदलीने अमरावती महापालिकेला आयएएस संवर्गातील अधिकारी आयुक्त म्हणून लाभणार असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या निवृत्तीनंतर १ जुलै २०२३ रोजी देविदास पवार यांच्याकडे अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यापुर्वी ते अमरावती महापालिकेतच अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान, सन २०२६ पासून अमरावती महानगरपालिकेत नॉन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नगरविकास विभागाने नियमबाहयता चालविली असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनिल खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी सन २०१६ पासून नॉन आयएएस अधिकाऱ्याची नियमबाह्यपणे नियुक्ती करण्यात येत असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले होते. देविदास पवार यांच्या बदलीला ती पार्श्वभूमि असण्याची शक्यता नाकारता येत नाही.