अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) मध्ये लवकरच १५ कोटी रुपये किंमतीची एमआरआय मशीनसह इतर विविध आजारांसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने अमरावती आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी १३२ कोटी ६३ लाख ९७ हजारांचा निधी मंजूर केला आहे. ४ जुलै रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये अमरावती विभागासह मध्यप्रदेशातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहे. याठिकाणी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसह, कर्करोग, ह्रुदयविकार, ० ते १४ वर्ष वयोगटातील बालकांचे गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी तसेच इतर विविध शस्त्रक्रिया देखील होत आहे. परंतु याठिकाणी एमआरआय मशीनसह इतर आजारांसाठी आवश्यक असेलेली यंत्रसामग्री रुग्णालयाला मिळालेली नव्हती. रुग्णालयात उपलब्ध असेल्या सुविधा लक्षात घेता ऑक्टोंबर २०२२ मध्ये रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या विविध यंत्रसामग्री तसेच इतरही सोयी सुविधा सुरु करण्याची मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने नाशिक व अमरावती या दोन्ही रुग्णालयांसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी १३२ कोटी ६३ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील जुलै २०२३ च्या अधिवेशनातील पुरवणी मागणीमध्ये उपलब्ध निधीतून ही गरज भागविण्यात येणार आहे.