ठाणेदार झाले पर्यावरणमित्र, लोकसहभागातून रनिंग ट्रॅक, बगीचा होणार
येवदा : कायदा व सुव्यवस्थेची स्थिती राखतानाच येवद्याचे ठाणेदार अमूल बच्छाव हे पर्यावरणमित्र बनून या ठाण्याच्या आठ एकरातील परिसरातील स्वच्छता लोकसहभागातून राखत आहेत. त्यामुळे ठाण्याच्या परिसरात कमालीची स्वच्छता पाहायला मिळत आहे.
ब्राह्मणवाडा थडी येथून बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक अमूल बच्छाव यांनी स्वत: कुदळ व खराटा खांद्यावर घेऊन व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन येवदा ठाण्याच्या आवारात झाडांची निगा राखतात. येवदा परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी या सर्वांच्या श्रमदानातून आठ एकर परिसरातील साफसफाई करून त्यांनी ठाण्याचा परिसर सुंदर व सुसज्ज केला आहे. एरवी दुर्लक्षित असलेली ही वास्तू रंगरंगोटी करून सुंदर व सुशोभित करण्यात आली. या आवारामध्ये पोलीस भरती व सैन्य भरती प्रशिक्षणाकरिता रनिंग ट्रॅक बनवण्याचा ध्यास त्यांनी ठेवला आहे. विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज वाचनालय, चिमुकल्यांकरिता खेळण्याची साधने तसेच निरनिराळ्या झाडांची नर्सरी आकारास येत आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.