आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : मावळत्या वर्षाची रात्र व नववर्षाची पहाट, हंडी आणि ब्रँडीने साजरी करणे ही बहीरम यात्रेतील आजवरची परंपरा. अलिकडच्या काळात ही परंपरा मोडित निघताना दिसत आहे. यात्रेचा फेरफटका मारला असताना हंडीच्या जागी रोडग्यांचा धूर यात्रेत दिसून आला. त्यामुळे बहीरम बुवाच्या भक्तांनी आपला नववर्षाचा शुभारंभ बहीरम बुवाचा आशीर्वाद व रोडग्याचा प्रसाद घेऊन केले.यापूर्वी या यात्रेतील ३१ डिसेंबरची रात्र व नववर्षाची पहाट ही मास आणि मद्य शौकिनांसाठी पर्वनीच असायची. त्यातच आंबटशौकिनांसाठी तमाशाची ‘राहुटी’ अधिकच झिंग आणायची. परंतु आ. बच्चू कडू यांनी अनेकांचा विरोध पत्करून यात्रेतील तमाशे कायमस्वरुपी बंद केले. यासाठी त्यांना पोलीस व आरोग्य विभागाने शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळे न्यायालयीन लढाई ही यशस्वी झाली. त्यामुळे बहिरम यात्रेला आध्यात्मिक, पारिवारिक व प्रबोधनात्मक यात्रा अशी नवी ओळख मिळाली. परिणामी बहीरम यात्रेत पूर्वीपेक्षा महिलांचा सहभाग हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.आज बहीरम यात्रा खऱ्या अर्थाने पारिवारिक झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसणाऱ्या रोडगे पार्टीच्या धुरावरून दिसून येत होते. नववर्षाच्या पहिल्या दिनी हजारो कुटूंब सहपरिवार भांडे तलावाच्या काठावरील मोकळ्या जागेत आपले बस्तान मांडून खमंग वांग्याची भाजी व रोडग्याची तयारी करीत होते. रोडगा व भाजी तयार झाल्यानंतर सर्वांनीच हा नैवेद्य आधी सहकुटूंब बहीरम बुवाला दाखविला. नैवेद्य दाखविताना हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे व आनंदाचे जाऊ दे असा आशीर्वादही बहीरमबुवाला मागीतला. नंतर सर्वांनी सामूहिकरित्या रोडगा व भाजी प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहन केला. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा हा आनंद प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.मिळाला शासकीय पूजेचा मानतमाशा बंदीच्या पूर्वी ही यात्रा हवशा, गवशा, नवशा व आंबटशौकिनांसाठी प्रसिद्ध होती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी त्यांच्या अध्यक्ष काळात शासन व प्रशासनाला हाताशी धरून या यात्रेला ‘शासकीय जत्रेचे’ स्वरूप दिले. बहीरम बुवाला शासकीय पुजेचा मानही मिळवून दिला. या जत्रेच्या माध्यमातून शासनाच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. हे प्रयत्न पुढेही सुरू राहण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकारण विसरून एकत्र येण्याची गरज आहे.हंडी शौकीन सिताफळाच्या बनातहंडी आणि मद्याची परंपरा जपणारे आजही बहीरम यात्रेत आहेत. या शौकीनांना आज यात्रेचे स्वरूप बदलल्यामुळे आपली हौस पूर्ण करून घेण्यासाठी काशी तलाव परिसरातील सिताफळाच्या घनदाट बनाचा आधार घ्यावा लागला. या घनदाट वनात हंडी शौकीनांनी ठिकठिकाणी आपले बस्तान मांडून नववर्षाचा जल्लोष साजरा केला.
बहिरम यात्रा पालटतेय रुपडे, प्रबोधनात्मक परंपरेचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:45 PM
मावळत्या वर्षाची रात्र व नववर्षाची पहाट, हंडी आणि ब्रँडीने साजरी करणे ही बहीरम यात्रेतील आजवरची परंपरा. अलिकडच्या काळात ही परंपरा मोडित निघताना दिसत आहे.
ठळक मुद्देप्रसादाची रेलचेल : आनंदोत्सवात महिलांचाही सहभाग, दर रविवारी वाढतेय गर्दी