चांदूररेल्वे : स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत माझी वसुंधरा दीनदयाल अंत्योदय व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने चांदूररेल्वे नगर परिषदेद्वारा महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने बचत गटाच्या महिलांसाठी हळदी-कुंकू व रोपवाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना लांजेवार होत्या. मुख्याधिकारी मेघना वासनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर बांधकाम सभापती शुभांगी वानरे, नगर परिषद सदस्य स्वाती मेटे, सुरेखा तांडेकर, दीपाली मिसाळ, शारदा मेश्राम, नीलिमा शर्मा तसेच नगर परिषद कर्मचारी गणोरकर, पटेल, रामटेके आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक पटले यांनी केले. मुख्याधिकारी वासनकर यांनी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण व इतरही शासकीय योजनांची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा सहभाग असला पाहिजे, असे प्रतिपादन स्वाती मेटे यांनी कले. याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक नितीन इमले यांनीसुद्धा भूमिका विशद केले. यानंतर महिलांना रोपवाटप करण्यात आले. याप्रसंगी संगीता इमले, देविका वनवे, शालिनी रामटेके, अश्विनी मंडाईत, शारदा मोरे व बचत गटाच्या असंख्य महिला उपस्थित होत्या. संचालन धनश्री श्रीराव यांनी केले.