अमरावती : राज्यात आरटीई अंतर्गत ९१७ वसतिस्थानांच्या ४८७५ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे. स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी वाहतूक भत्ता, सुविधांसाठी मंजूर केली आहे. शालेय शिक्षण विभागाने २० फेब्रुवारी २०२० रोजी निर्णय जाहीर केला आहे.
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क नियम, २०११ मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, ही वाहतूक सुविधा देताना आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांचे शाळांमध्ये ये-जा करण्याचे अंतर हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार लहान वस्तीमधील बालकांना शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्यासाठी तीन किंवा पाच किलोमीटर अंतरावर वाहतूक भत्ता, सुविधा देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
असा मिळणार विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ताअहमदनगर- ५४, अकोला- २१, औरंगाबाद- १२१, भंडारा- ७, बुलडाणा - २५२, चंद्रपूर- ५२, धुळे - २५५, जालना -१३, कोल्हापृूर - २२९, नागपूर- ४४, नंदूरबार २, नाशिक- ११९, उस्मानाबाद- २४, पालघर- २०, पुणे- २०९, रायगड- ८, रत्नागिरी - २२, सातारा- ६ , सिंधुदूर्ग - ९, सोलापूर- ९६, ठाणे- ३, वाशिम- ८५, यवतमाळ- ७.