आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अमरावती मार्गावर साधारण एसटीच्या बसफेऱ्या मोडीत काढून शिवशाही बस लावल्यापासून प्रवाशांना ताटकळत ठेवण्यासह आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परतवाडा आगाराच्या या प्रतापाबद्दल ‘महामंडळाची लुटशाही’ असा संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ आणि प्रवाशांची ये-जा परतवाडा-अमरावती मार्गावर आहे. परतवाडा आणि अमरावती बसस्थानकावरून प्रत्येक दहा मिनिटाला एक बसफेरी सोडली जात असल्याची आगाराची माहिती आहे. मात्र, गत महिनाभरापासून अमरावती मार्गावर धावणाऱ्या महामंडळाच्या सर्वसाधारण आणि जलद बसगाड्यांच्या कमी करून शिवशाहीच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड दिला जात आहे.परतवाडा-अमरावती या पन्नास किलोमीटर अंतरासाठी जलद बसगाडीचे ५८ रुपये आकारण्यात येते, तर तेवढ्याच अंतरासाठी शिवशाही बसचे ८६ रुपये तिकीट घेतले जाते. अशाप्रकारे तब्बल २८ रुपयांचा भुर्दंड प्रवाशांना पडतो. परतवाडा आगारात सोमवारी सकाळी ८ वाजता दोन शिवशाही बस अमरावतीकरिता लावण्यात आल्या होत्या. तब्बल दीड तास दुसरी कुठलीही बस लावण्यात आली नव्हती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मुकुंद देशमुख यांनी तक्रार केली. विशेष म्हणजे, तिकिटात ५० टक्के सवलत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीमध्ये पूर्ण तिकीट लागत असल्याने काही जण बस स्थानकावर ताटकळत होते.शिवशाहीला ४८ फेऱ्यापरतावडा आणि अमरावती आगाराच्या प्रत्येकी चार अशा एकूण आठ शिवशाही बस अमरावती मार्गावर दिवसभर धावतात. त्यांच्या एकूण ४८ फेऱ्या होतात. शिवशाही बस पूर्ण भरल्याशिवाय साधारण बसफेरी लावली जात नाही. परिणामी, शासकीय कामकाज, दवाखाना, इतर महत्त्वपूर्ण कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड परिवहन महामंडळाकडून दिला जात आहे. नागरिकांमधून याचा संताप व्यक्त करण्यात येत असून, ही ‘लुटशाही’ थांबविण्याची मागणी होेत आहे.परतवाडा आगारातून अमरावतीसाठी दर दहा मिनिटांनी बसफेऱ्या सुटतात. शिवशाहीच्या दोन्ही आगारांतून आठ बसच्या ४८ फेऱ्या होतात. याशिवाय सर्वसाधारण, जलद बस असा २०० फेऱ्या दिवसभर होतात.- नीलेश मोकलकर, वाहतूक नियंत्रक, परतवाडा आगार
‘शिवशाही’च्या नावावर परिवहन मंडळाची ‘लुटशाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:43 IST
अमरावती मार्गावर साधारण एसटीच्या बसफेऱ्या मोडीत काढून शिवशाही बस लावल्यापासून प्रवाशांना ताटकळत ठेवण्यासह आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
‘शिवशाही’च्या नावावर परिवहन मंडळाची ‘लुटशाही’
ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : प्रवाशांना ठेवले जाते ताटकळत