वरूड : नोव्हेंबर २०२० ला आयपीएस अधिकारी श्रेणिक लोढा वरूडचे ठाणेदार म्हणून रुजू होताच अवैध ओव्हरलोड रेती तस्करीला चाप लावण्यासाठी ४५ डंपरवर कारवाई करण्यात आली. परीविक्षाधीन कालावधी संपल्यावर ते कार्यमुक्त झाले. आता पुन्हा रेती तस्करांची मनमानी सुरू झाली. ओव्हरलोड रेती तस्करी सुरूच असून, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे मात्र चांगभले सुरू आहे.
महसूलचे फिरते पथक कुचकामी ठरत असल्याने अवैध रेती वाहतुकीला तालुक्यात उधाण आले आहे. रेती तस्करीला आळा घालण्याकरिता नोव्हेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र सीमेवर वर्धा नदीचे बेरिअरवर कारवाई करून रेतीचे तब्बल ३५ ओव्हरलोड अवैध वाहतूक करणारे डंपर जप्त करून डंपर मालकावर दलालासह फौजदारी गुन्हे दाखल करून रेती तस्करीला चांगलाच चाप लावला होता. यामुळे जानेवारीपर्यंत ओव्हरलोड रेतीवाहतुकीला लगाम लागला होता. मात्र पुन्हा रेती वाहतूकदारांनी डोके वर काढून ओव्हरलोड रेतीची तस्करी सुरु केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाची वाट लागली
डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ३० ते ४० टन रेती वाहतूक केल्या जाते. क्षमतेपेक्षा दुप्पट रेती वाहतुकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्याची वाट लागली आहे. अनेक ठिकाणी तडे जात आहेत. तर डांबरी रस्ते उखडत आहे. यामुळे यांना लगाम कोण लावणार हा यक्ष प्रश्न आहे.