अमरावती : जवळील व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास व मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असल्यास खासगी वाहन किंवा ॲम्ब्युलन्सने हा खर्च परवडत नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाने सामाजिक जबाबदारी म्हणून मेल, एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्यातून मृतदेहाची वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ते ही नाममात्र हजार किंवा दीड हजार रूपयात मृतदेह नेता येणार आहे.
रस्ते वाहतुकीने मृतदेह लांब पल्ल्यापर्यंत वाहून नेणे ही बाब खूप खर्चिक आणि वेळ घेणारी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे वाहतुकीचे साधन हे सामाजिक दायित्व जोपासणारे असावे, यासाठी मेल, एक्स्प्रेसच्या मालवाहू एलएलआर कोच मधून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह नेण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागणी केल्यास त्यानुसार मालवाहू डबा बुक केला जातो. मृतदेह ट्रेनच्या एसएलआर कोचमध्ये नेला जातो. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दोन पार्सल एसएलआर कंपार्टमेंट असतात. पहिला आणि शेवटचा एसएलआर कोच असतो. यातून मृतदेहाची वाहतूक होते.
नातेवाईकांची विनंतीनंतर पार्सल डबा केला जातो बुक
नातेवाईकांकडून मृतदेह वाहून नेण्याची विनंती मिळाल्यावर रेल्वे चार टन क्षमतेच्या एसएलआर पार्सल डब्यांपैकी एका डब्यात पार्सल वाहतूक होत नाही. रेल्वेला एका मालवाहू डब्यातून ३० हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, ज्या दिवशी मृतदेह वाहतूक होईल, त्या दिवशी या डब्यातून मालाची वाहतूक केली जात नाही. सामायिक दायित्व आणि मानवतेला रेल्वे प्राधान्य देते, हे दिसून येते. मुंबई ते उत्तर, दक्षिण भारताच्या लांब अंतरासाठी हे केवळ एक हजार ते दीड हजार रूपये शुल्क आकारले जातात.
२०२० ते आतापर्यंत १५४० मृतदेह रेल्वेच्या एसएलआर डब्यातून वाहतूक करण्यात आली आहे. मालवाहू डब्यातून मृतदेहाच्या वाहतुकीपोटी ४.६२ कोटींच्या उत्पन्नाचा फटका रेल्वेला बसला आहे. असे असले तरी प्रवाशांच्या दु:खाच्या क्षणी, मृतदेह वाहतुकीचा किमान टोकन खर्च घेऊन रेल्वे आपली सामाजिक जबाबदारी संवेदनशीलतेने पार पाडत आहे.
- राम पाॅल बारपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मुंबई मध्य रेल्वे