लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी संचारबंदी लागू केली असली तरी अमरावती-परतवाडा मार्गावरील वाहतूक कमी झालेली नाही. विशेषत: आसेगावात कुठल्याही कारणांशिवाय दुचाकीला थैली लटकवून आलेले युवक मोठ्या संख्येने दृष्टीस पडत असून, त्यांना आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी देशात 'लॉकडाऊन'चे शस्त्र उपसण्यात आले. आसेगाव येथील नागरिक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे. तथापि, काही जण या नीरव शांततेचा अनुभव घेण्यासाठी अकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे. परिसरात सर्वच रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांनी घराबाहेर निघणारे दिसून येतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, काही तरी आणण्यासाठी निघालो होतो म्हणणारे रिकामी थैली दाखवून आपली सुटका करून घेतात. एवढेच नव्हे तर सकाळी व रात्री जेवणानंतरही नागरिक फिरत असल्याचे दिसून येत आहेत. अशांवर कठोर कारवाई करावी, अशी आसेगाववासीयांची मागणी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. जनतेच्या आरोग्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येऊ नये. गुरुवारपासून वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.- किशोर तावडे, ठाणेदार, आसेगाव पूर्णा