वाघ, बिबट्यांची सुरक्षितता, वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश, वरिष्ठांना पाणवठे तपासणीच्या सूचना
अमरावती : मार्च महिन्यात सूर्य तापू लागल्याने यंदा जंगलात पाणीटंचाईची तीव्रता जाणवेल, असे संकेत आहेत. वनक्षेत्रातील नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे वन्यजीव, पशूपक्ष्यांसाठी सज्ज करण्याचे निर्देश मिळाले आहेत. विशेषत: मुख्य पाणवठ्यावर ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवावे आणि येथे रात्री-अपरात्री वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या आहेत.
व्याघ्र प्रकल्प अथवा वनविभागातील पाणवठ्यांचा आढावा घेऊन पाणीटंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याचे कळविले आहे. उन्हाळा प्रारंभ होताच विदर्भातील पाणवठ्यांवर विषप्रयोगाद्धारे वाघ, बिबट्यांची शिकार केली जाते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना नियमित पाणवठ्यांची तपासणी करावी लागणार आहे. ज्या पाणवठ्यांवर वन्यजीव मोठ्या संख्येचे तृष्णा भागविण्यासाठी येतात, त्या पाणवठ्यांवर ‘ट्रॅप कॅमेरे’ लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यांची नियमित तपासणी करावी लागणार आहे. कृत्रिम पाणवठ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे पत्रात नमूद आहे. विदर्भात सहा व्याघ्र प्रकल्प, नऊ अभयारण्य आणि २० राखीव वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी आटत असल्याची बाब वन्यजीव विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---------------------------
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करावी नियमित तपासणी
वनक्षेत्रात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावे लागेल. युरियामिश्रित पदार्थ, विषप्रयोेगाबाबत वनाधिकाऱ्यांनी सजग असावे. पाणवठ्यांबाबत वनकर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. पाणवठ्यात तपासणीसाठी पीए पेपरचा वापर करावा. पाणवठ्याची दररोज देखरेख आणि पाणी तपासणी करावी. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी आकस्मिक भेट देऊन पाणवठे तपासणी करावे, असे वाईल्ड लाईफचे पीसीसीएफ यांनी कळविले आहे.
-----------------
उन्हाळ्यात वन्यजिवांबाबत अतिशय सजग राहावे लागते. विशेषत: पाणवठ्यांवर विषप्रयोग, शिकारीच्या घटना घडतात. त्यामुळे मुख्य पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसवून त्याद्वारे नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाणवठ्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.