अमरावती : स्थानिक नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमील कॉलनी येथे एका घरी सुरू असलेल्या जुगारावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ लाख ५१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात वसीम करोडपती या माजी नगरसेवकाचा देखील समावेश आहे.
सीआययू पथकानुसार, जमील कॉलनी येथील बादशाहा पठाण बाबाद्दीन पठाण याने त्याच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर जुगार भरविल्याची माहिती नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या सीआययूला (क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन युनिट) मिळाली. त्या आधारावर पथकाने धाड टाकली. या कारवाईत बादशाहा पठाण बाबाद्दीन पठाण (२५, रा. पठाण चौक), अब्दुल वसीम उर्फ वसीम करोडपती अब्दुल मजीद (४१, रा. जमील कॉलनी), शेख आसीफ शेख जब्बार (४२, रा. तारखेडा), अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (३०, रा. धर्मकाटा), सय्यद मुजाहित सय्यद नूर (३२, रा. जुनी वस्ती, बडनेरा), अब्दुल कादीर शाहीद खान (३०, रा. हबीबनगर), दानिश खान फारुक खान (२१, रा. पॅराडाइज कॉलनी), अफरोज खान मजीत खान (४४, रा. पठाण चौक), इजार अहमद शेख तुरा (२३, रा. पठाण चौक) व रियाजोद्दीन बद्रोद्दीन (३३, रा. पठाण चौक) यांना ताब्यात घेण्यात आले.
नऊ मोबाईल सापडले
जुगाऱ्यांकडून ५३ हजार २२० रोख, ९० हजारांचे नऊ मोबाइल, टेबल, खुर्च्या व अन्य साहित्य असा एकूण १ लाख ५१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नागपुरी गेटचे ठाणेदार अनिल कुरळकर, सिआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर, विनय मोहोड, जहीर शेख, विनोद काटकर आदींनी केली.