श्रीकृष्ण धोटे महाराज यांचा विक्रम : दुचाकीच्या माध्यमातून जनजागृतीअमरावती : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही समाजामध्ये अंधश्रध्देच्या रुढी प्रथा कायम आहेत. गाडगेबाबांच्या विचाराने झपाटलेले व समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले जिल्ह्याचे सुपुत्र श्रीकृष्ण धोटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी श्री संत गाडगेबाबा प्रबोधन यात्रेअंतर्गत दुचाकीवर प्रवास करून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली.श्री संत गाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन यात्रा प्रचारअंतर्गत २२ जिल्ह्यातील अंदाज दोनशे तालुक्यांतील अनेक पोलीस स्टेशनला श्रीकृष्ण धोटे यांनी भेटी देऊन महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंध, जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, चमत्कार सादरीकरण व त्यातील सत्य या विषयांवर पोलिसांना व नागरिकांना मार्गदर्शन केले. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रभर सातत्यपूर्ण अहोरात्र हे कार्य सुरू असून साठ हजार कि़मी.चा प्रवास श्रीकृष्ण धोटे यांनी पूर्ण केला. वयाची साठी पार केल्यानंतरही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह श्रीकृष्ण धोटे यांच्यामध्ये असून पोटापाण्याच्या साहित्याची बॅग खाद्यांवर घेतली की, प्रवास सुरू. ऊन, पाऊसाची चिंता नाही. अनेक दिवस या प्रवासादरम्यान कुटुंबाचीही भेट नाही, अशी त्यांची लौकिकता. त्यांच्या बोलीत गाडगेबाबाच्या विचाराचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही ते आपल्या अस्सल वऱ्हाडी शैलीतून मंत्रमुग्ध करतात. राज्यात जनजागृती केल्यानंतर इतर राज्यातही हे कार्य शेवटच्या श्वासापर्यत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केला २२ जिल्ह्यांचा प्रवास
By admin | Published: August 22, 2016 12:03 AM