पोलिसांचे दुर्लक्ष : रस्ता सुरक्षा अभियानाची लागली वाट, अपघात घडल्यास जबाबदार कोण? धारणी : तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीला प्रचंड प्रमाणात उत आला आहे. हासर्व प्रकार पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याने नाईलाजास्तव प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मेळघाटातील आदिवासींची जीवनसंगिनी म्हणून विख्यात असलेली अकोला-महू या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण होत असल्याने एक डिसेंबपरपासून ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. याचाच फायदा अकोला व अकोट येथील खासगी बसधारकांनी उचलला आहे. या बसधारकांनी कोणताही परवाना नसताना ७ ते ८ गाड्या धारणी ते अकोट मार्गे सुरू केल्या आहेत. अवैधरित्या सुरू असलेल्या या बसेसवर धारणी-अकोट-धारणी असे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, या बसेसवर परवाना कालावधी, वेळापत्रक, दरफलक व विमा मुदतीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत. अवैधरित्या धावणाऱ्या बसेसबद्दल तक्रार झाल्यावर थातूरमातूर तपासणी करून चौकशीचा देखावा वाहतूक पोलिसांनी केला. मात्र, नंतर सगळ्यांना अभयदान देण्यात आले आहे. या बसेसवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबूून नेले जात आहेत. बसच्या छतावर बसवून सुद्धा जीवघेणा प्रवास सतत सुरू आहे. या बसेसला अपघात होऊन प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधितांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)घाटातून सर्रास धोकादायक वाहतूकअकोट ते धारणीचे अंतर ९६ किलोमीटर आहे. यापैकी जवळपास २५किलोमीटरचे अंतर अंत्यत लहान मार्गावरील घाटवळणावरून चालतात. क्षमतेपेक्षा जास्त व लवकर पोहोचण्याच्या व प्रवासी मिळविण्यासाठी या बसेसध्ये अक्षरश: शर्यत लागते. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
धारणीत खासगी बसेसच्या टपावर बसून प्रवास
By admin | Published: January 26, 2017 12:41 AM