धारणी/चिखलदरा : परतवाडा ते धारणी रोडवर सेमाडोह (ता. चिखलदरा) नजीक घाटवळणातील पुलाच्या खाली नाल्यात खाजगी बस कोसळून भीषण अपघात चार प्रवासी ठार झाले, तर ४४ जण जखमी झाले आहेत.
प्रांजली रघुनाथ इंगळे (३८, रा. अमरावती), राजेंद्र मोतीलाल पाल (५९, रा. भोकरबर्डी), पल्लवी कदम (३२, रा. अमरावती), फुलवंती राजू काजळे (३४, रा. रोहिणीखेडा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली. परतवाडावरून धारणीकडे जाणारी चावला नामक खासगी बसला हा अपघात घडला. जखमींवर सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी रुग्णालयाला भेट देऊन मृतक व्यक्तींच्या नातेवाइकांना धीर दिला.
अपघातात बसचा चालकदेखील जखमी झाला असून त्याच्यावर अचलपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत. प्रांजली इंगळे या मेळघाटात आहारतज्ज्ञ, तर पल्लवी कदम या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राजेंद्र पाल हे वसंतराव धारणीतील नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते.
यापूर्वी सकाळच्या सुमारास १२ जण ठार झाल्याची माहिती समाज माध्यम व कर्णोपकर्णी पसरली होती. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी सोमवारी सकाळी कार्यालयाच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खाजगी बस मधून प्रवास करीत असतात. हा संदर्भ लक्षात घेऊन जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. तथापि, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले आणि मृतांचा आकडादेखील घसरला.
अमरावतीहून सकाळी पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा निघाली. परतवाडा येथून पुढे धारणी आणि खंडवा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यांवर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली, अशी माहिती या अपघाताच्या अनुषंगाने पुढे आली आहे. मेळघाटात सकाळपासून संततधार पाऊस असल्याने प्रशासनाला मदतकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे मृतांच्या आकड्याबाबत संभ्रम दुपारपर्यंत कायम होता.