योजनेचा बोजवारा, जीवनरक्षक प्रणालीतील वनस्पती नष्ट होण्याचा मार्गावर
अनंत बोबडे
येवदा : रस्त्यांच्या बांधकामासाठी आधीच कोट्यावधी वृक्षांची कटाई करण्यात आली. ठेकेदाराकडे कुणाचे लक्ष नसल्याने ठेकेदारांनी रस्त्याच्या सीमेबाहेरील झाडे कापून वृक्षांचा नायनाट करण्यात आला. आता येवदा परिसरात शेताच्या धुऱ्याला राहिलेली बोटावर मोजण्याएवढी झाडेसुद्धा शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून आग लावून व झाडांच्या बुंध्याशी जखमा करून नष्ट करीत आहेत. जीवनरक्षक प्रणालीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या वनस्पती पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
येवदा गावाच्या पंचक्रोशीत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून, लाखो रुपयांची वनस्पती नष्ट होत आहेत. वृक्षतोडीमुळे शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा बोजवारा उडाला आहे. दर्यापूर तालुक्यातील अशा अनेक परिसरातील जंगलात तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाची खुलेआम कत्तल सुरू आहे. येवदा ते उमरी, येवदा ते घोडचंदी (शहीद) या रस्त्यावरील शेतातील अनेक झाडांवर कुऱ्हाडीने घाव घालून ती वाळवण्याचा प्रयत्न केल्याचे दृष्टीस पडत आहे. झाडांच्या बुंध्याला आग लावून ते नष्ट केले जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बाभळीचा समावेश आहे. खारपाणपट्ट्याचे वैशिष्ट्य असलेल्या शेकडो बाभळींची कत्तल होत असताना वनकर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाईच्या मुद्द्यावर गप्प आहेत.
अपघाताचीही शक्यता
रस्त्याच्या कडेला झाडांच्या बुंध्याला आग लागल्यामुळे झाड केव्हाही कोसळून दुर्घटना होऊ शकते, याचे भान न बाळगता दिवसाढवळ्या झाडांना आगी लावल्या जातात. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. वनविभागाने संबंधित दोषींवर कारवाई करून या परिसरातील वृक्षवल्लीचे रक्षण करावे, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.
----------------