तोंगलाबादचा ''नकुल'' पोलीसाची नोकरी सांभाळून करत आहे एक हजार वृक्षाचे संगोपन
पर्यावरण संवर्धनासाठी झटणारा ''खाकीतला'' वृक्षप्रेमी.....
तोंगलाबादचा ''नकुल'' पोलीसाची नोकरी सांभाळून करत आहे एक हजार वृक्षाचे संगोपन
फोटो पी ०४ र्दयापूर
तोंगलाबादच्या नकुलकडून एक हजार वृक्षाचे संगोपन
दर्यापूर : ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी’ या संतवचनावर प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी लोक समाजात असतात. त्यांच्यापैकी एका पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून कोसोदूर असणाऱ्या दर्यापूर तालुक्यातील ‘खाकी’तल्या युवकाचे कार्य जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर कौतुकास्पद आहे.
नकुल सुरेशराव जऊळकार (३०, रा. तोंगलाबाद) असे पोलीस दलातील या युवकाचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात एक हजार वृक्षांची लागवड करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलला आहे. या झाडांमध्ये साग, चंदन, मिलिया डुबिया अशा झाडांचा समावेश आहे. पूर्ण दहा हजार वृक्ष लावण्याचा त्याचा संकल्प आहे. या युवकाने लावलेली झाडे जगविण्यासाठी साप्ताहिक सुटीच्या द असली की अमरावती वरून रात्रीबेरात्री प्रवास करून घरी येतो व सकाळीच या झाडांना पाणी देऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू होतो. त्याचे हे कार्य तीन वर्षांपासून निरंतर सुरू असते. नकुलने आपल्या शेतात लावलेल्या या एक हजार वृक्षासोबतच घरामध्येसुद्धा खुल्या जागेत मनमोहक परसबाग निर्माण केली आहे. या पर्यावरण संवर्धनकार्यात कुटुंबाचे मोठे सहकार्य व पाठबळ त्यांना मिळत आहे, ही विशेष बाब आहे.
राष्ट्रीय विद्यालयात शालेय शिक्षण घेत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राकडे नकुल ओढला गेला. गावातील जय बजरंग व्यायामशाळेत कसरत करीत पोलीस होण्याचे स्वप्न रंगविले व ते प्रत्यक्षात उतरविले. या व्यायामशाळेच्या मैदानावर सत्तर वृक्षांचे संगोपन त्याने केले. अमरावती येथील पोलीस वसाहतीतसुद्धा नकुलने वृक्षलागवड केली. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याने मित्र, नातेवाइकांमध्ये जनजागृती केली. त्याच्या परिणामी त्यांनीसुद्धा झाडे जगविण्याचा ध्यास घेतला आहे. तोंगलाबादच्या नकुलने पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केलेली ही मोहीम आजच्या समाजाला नक्कीच दिशादर्शक आहे.
---------------------------------------
कुटुंबीयांचे सहकार्य
नकुल यांचे वडील सुरेश जऊळकार शेतकरी व आई गृहिणी आहे. घरी स्वस्त धान्य दुकान आहे. या कार्यात भाऊ, पत्नी, बहीण-जावई यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन त्यांना मिळते.
--------------------------------------
मुलीच्या जन्मानिमित्त एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प
नकुलचे गतवर्षी लग्न झाले. या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिच्या पहिल्या जन्मदिनानिमित्त यावर्षी पावसाळ्यात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
===Photopath===
040621\img-20210604-wa0003.jpg
===Caption===
दयार्पूर