अमरावती : युती शासनाच्या काळात राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा विक्रम करण्यात आला. परिमाणी, चार ते पाच टक्के जमीन वृक्षाच्छादनाखाली आलेली आहे. असे असताना बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्गालगत ११ लाख वृक्षलागवड करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली गेली आहे. वृक्षलागवडीसाठी राज्याचा वनविभाग असताना बाहेरील एजन्सी नियुक्त करण्याचा खटाटोप का?, हा सवाल उपस्थित होत आहे.
समृद्धी महामार्ग पर्यावरणपूरक करण्याचा मानस असला तरी फेज वनच्या ५२० किमीपर्यंत वृक्षलागवड नसल्याने या महामार्गावरून प्रवास करताना डोळ्यासमोर शीतल सावलीचा अभाव दिसून येतो. सात महिने लोटल्यानंतर ही महामार्गावर उंच रोपे लावण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा समृद्धी हायवे शिर्डीपर्यंत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासाकरिता खुला करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावर उन्हाच्या चटक्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होत असल्याने दोष टायरांवर दिला जात आहे. हायवेला शीतल करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या अधिग्रहीत जमिनीवर सिमेंटच्या भिंतीचे आवरण तयार करण्यात आले. मात्र, त्यावर वृक्षांचा पत्ता नाही. परिणामी, हा महामार्ग भकास दिसून येत आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी वनविभाग असताना एमएसआरडीसीने वृक्षलागवडीसाठी खासगी एजन्सी नेमली आहे.समृद्धी महामार्गालगत वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत वरिष्ठ स्तरावर धोरण ठरविले आहे. वाशिम, वर्धा, छत्रपती संभाजीनगर या भागात वृक्ष लागवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही ती लवकरच एजन्सीच्या माध्यमातून राबविली जाईल. देखरेख व नियंत्रणासाठी अभियंता नेमला जाईल. - गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, अमरावती.