फोटो पी ०८ चिचखेडा
पान २ चे लिड
आदिवासी पाड्यांत घरोघरी रात्रीतून जनजागृती
चिचखेडा येथे लसीकरणाला चांगला प्रतिसाद
चिखलदरा : मेळघाटातील आदिवासी अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर ‘लोकमत’ने त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. आता प्रशासन गावागावांत रात्रीतूनसुद्धा जनजागृती करीत आहे. त्याच्या परिणामी एकमेव महिलेचे लसीकरण झालेल्या चिचखेडा येथे ७० पेक्षा अधिक आदिवासींनी लसीकरणाचा लाभ घेतला. याच पद्धतीने संपूर्ण मेळघाटात लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
चिखलदरा तालुक्यातील आदिवासींमध्ये कोरोनासंदर्भात अंधश्रद्धेचा कळस असल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या लसीकरणाला तालुक्यात आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसादच मिळाला नाही. त्यानंतर तहसीलदार माया माने यांनी रात्रीतून गावोगावी बैठकी घेऊन आदिवासींची समजूत काढायला सुरुवात केली. त्याचा परिणाम जाणवू लागला असून, आदिवासी लसीकरण करून घेत असल्याचे चित्र आहे. मेळघाटात आदिवासी पाड्यांमध्ये लसीकरणाने मृत्यू ओढवत असल्याची अफवा दूर सारण्यासाठी अंगणवाडी, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, महसूल कर्मचारी सर्वच मिळून आदिवासींना समजावत आहेत. कोरोनासंदर्भात धोका टाळण्यासाठी लसीकरणासाठी सर्व स्तरांवर रात्रीतून बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.
बॉक्स
चिचखेडात मिळाला प्रतिसाद
चिचखेडा गावात शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ७० हून अधिक आदिवासींनी लसीकरण केले असल्याचा आकडा प्रशासनाने दिला. हा पॅटर्न संपूर्ण मेळघाटात राबविण्याची तयारी असल्याचे तहसीलदार माया माने यांनी सांगितले.
कोट
गावागावांत बैठका दवंडी व आरोग्य, महसूल कर्मचाऱ्यांकडून आदिवासींची समजूत घालून लसीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी चिचखेडा गावात चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रयोग उर्वरित गावातसुद्धा केला जात आहे.
- माया माने, तहसीलदार चिखलदरा