अमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिक येथील आयुक्तालयातून निर्देश प्राप्त झाले असून, प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी मुलांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने १६ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात एकूण १२,५२४ पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पद भरतीसाठी वित्त विभागाने सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१९ या वर्षातील ५२२७ पदे व सन २०२० या वर्षातील ६७२६ पदे, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुकतालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवर्निमित ९७५ पदापैकी शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे शंभर टक्के भरण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या पोलीस भरतीत आदिवासी मुलांना संधी मिळावी, यासाठी ‘ट्रायबल’ला स्वतंत्र मार्गदर्शन करावे लागणार आहे. पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य, नामांकित शाळांच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अपर आयुक्त विनाेद पाटील यांनी दिली.