- संदीप मानकर
अमरावती : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्यावतीने विविध १३९५ जागांकरिता मेगा भरती घेण्यात येत आहे. मात्र, ६ फेब्रुवारीपासून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर एरर येत असल्याने विद्यार्थ्यांनी ओळखपत्रे काढावे कसे, हा प्रश्न पडला आहे. अनेक विद्यार्थ्यांवर या परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
अमरावती, नागपूर, नाशिक व ठाणे अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत शाळा व इतर विभागाकरिता विविध पदांकरिता विविध तारखांना सदर परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम), प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम), कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक), गृहपाल (स्त्री, पुरुष) अधीक्षक (स्त्री, पुरुष), ग्रंथपाल, प्रथोगशाळा सहायक अशा चार अप्पर आयुक्त कार्यालयातील जागांकरिता वेगवगळ्या दिवशी ही परीक्षा घेतली जात आहे.
अमरावती विभागाकरिता ९५ जागा, नागपूरकरिता १२५, नाशिककरिता सर्वाधिक ७६५, ठाणे विभागातून ४१० पदभरती करण्यात येणार आहे. विद्यार्थी शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा ओळखपत्र काढण्यास संपर्क साधत आहे. परंतु, वेबसाईटमध्ये एरर असल्याचे संकेतस्थळावर येत आहे. ट्रायबल पब्लिक स्कूलच्या परीक्षेतसुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा ओळखपत्रे डाऊनलोड न झाल्याने त्यांना नाशिक येथे ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मात्र, याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.