अमरावती : स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते तथा ज्येष्ठ नेते विदर्भवीर जांबुवंतराव धोटे (८३) यांचे शनिवारी पहाटे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. धोटे यांच्या निधनामुळे विदर्भावर शोककळा पसरली आहे. स्वतंत्र विदर्भाची सातत्याने लावून धरलेली मागणी आणि आंदोलनामुळे त्यांना विदर्भवीर असे संबोधले जाते. धोटे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाचा सच्चा पाठीराखा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्याशीही त्यांचा स्रेहबंध होता. विदर्भाचे आंदोलन शिखरावर असताना त्यांनी अमरावतीमध्ये अनेक मित्र जोडलेत. शनिवारी धोटे यांच्या निधनाचे वृत्त झळकताच स्थानिक राजकीय क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. त्यापैकी या काही शोकसंवेदना. त्यांनी पाच वेळा आमदारकी तर दोनदा खासदारकीही भूषविली. विधी मंडळासोबत संसदही गाजविली. (प्रतिनिधी)विदर्भ महाविद्यालयात शिकत असताना आम्ही रुममेट होतो. आम्हा दोघांना कृषी विद्यापिठाच्या चळवळीत एकाच वेळी कारावास झाला. वेगळ्या विदर्भाची चळचळ त्यांनी अत्यंत सचोटीने चालविली. त्यांच्या चळवळीचा मी पुरस्कर्ता होतो आणि राहील सुध्दा.विजयातार्इं व त्यांच्या कन्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो.- देवीसिंग शेखावत, माजी आमदारविदर्भावर होणाऱ्या अन्यायाला प्रखर विरोध करण्याची सुरुवात जांबुवंरावभाऊंनी केली. विशेषत: महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर कृषी विद्यापीठाबाबतीत सर्वप्रथम विदर्भाला झळ पोहोचली. त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जबरदस्त संघर्ष केला होता. त्यांची नेतृत्वशैली आक्रमक होती. ते नि:संशय विदर्भवीर होते.- बी. टी. देशमुख,माजी आमदार, अमरावतीविदर्भवीर म्हणून ते परिचित होते. ते एक लढवय्या व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने विदर्भाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. विदर्भ राज्याच्या लढाईसाठी त्यांनी अनेकदा सत्तेला लाथ मारली. त्याकरिता आपल्या विचाराशी त्यांनी कधीही तडजोेड केली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ते शेवटपर्यंत लढले. - सुनील देशमुख, आमदार, अमरावतीजांबुवंतराव धोटे ही विदर्भाची ओळख होती. या विदर्भाच्या मातीचे नाव उज्ज्वल केले आहे. ते धाडसी होते व तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. काही निर्णय चुकले नसते तर त्यांनी राष्ट्रीय नेतृत्व केले असते. त्यांनी विदर्भाची व शेतकऱ्यांची प्रामाणिक सेवा केली. त्यांच्या जिवंतपणी वेगळे विदर्भ राज्य झाले असते तर त्यांना व लोकांना खूप आनंद झाला असता. त्यांच्या जाण्याने या मातीची खूप मोठी हानी झाली आहे. - आ. बच्चु कडू, आमदार, अचलपूरपाच वेळा विधानसभेवर, तर लोकसभेवर दोन वेळा निवडून गेलेले जांबुवंतराव हे माझे निकटचे सहकारी होते. स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर त्यांनी विधानमंडळ गाजविले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबत इतर प्रश्नही त्यांनी आक्रमकपणे मांडले. या सच्चा कार्यकर्त्यास विनम्र श्रद्धांजली.- भैयासाहेब ठाकूर, माजी आमदार, तिवसाजांबुवंतराव धोटे व माझे सासरे नरसिंगराव घारफळकर फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार होते. त्यामुळे माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. एक निर्भीड व लढवय्या नेता हरविला. त्यांच्या जाण्याने ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. माझे काही वैचारिक मतभेद होते. पण त्यांनी पुत्रासारखे प्रेम दिले. त्यांच्या जाण्याने अपरिमित हानी झाली आहे. हे दु:ख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर बळ देवो. - वीरेंद्र जगताप, आमदार, चांदूररेल्वे विदर्भ राज्याच्या चळवळीसाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. मी यवतमाळला असताना त्यांची कार्यप्रणाली मला अधिकारी म्हणून जवळून पाहण्याचे भाग्य लाभले. त्यांच्यासारखे निर्भीड व्यक्तिमत्त्व विदर्भात पुन्हा होणे नाही. - रमेश बुंदिले, आमदार, दर्यापूर
विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंना श्रद्धांजली
By admin | Published: February 19, 2017 12:11 AM