सीपींचा शब्द : रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झडतीअमरावती : शहरातील दुचाकी चोरीचा आकडा चिंताजनक आहे. त्यावर मात करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाईल. सांख्यिकीय अभ्यास करून दुचाकी चोरट्यांचे पाळेमुळे खणून काढण्याचा सर्वंकष प्रयत्न करेन, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत दुचाकी चोरांनी मांडलेला मुक्त हैदोस ‘लोकमत’ने शनिवारी लोकदरबारात मांडला. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीतही दुचाकी चोरीच्या मालिकेबाबत जाणून घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दुचाकी चोरी थांबविण्याला प्रथम प्राधान्य राहील. ६-८ महिन्यांमधील दुचाकी चोरीसह एकंदरीतच गुन्ह्यांचा आलेख समजावून घेतल्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या जातील, असे आयुक्त मंडलिक म्हणाले. अमरावती पोलिसांनी यापूर्वी अटक केलेले दुचाकीचोर किंवा त्यांची टोळी सध्या कुठे आहे? कारागृहाबाहेर असल्यास कुठल्या भागात सक्रिय आहेत, याबाबत अभ्यास केला जाईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन दुचाकीचोरीच्या घटना नेमक्या किती, कुठल्या भागात आणि कशा पद्धतीने झाल्यात हे जाणून घेतल्यानंतर गुन्हे शाखेसह गस्तीपथक आणि संबंधित पोलीस ठाण्याला ‘अलर्ट’ केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘रिझल्ट ओरिएंटेड’ काम करण्यावर आपला भर असल्याचेही मंडलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दुचाकीचोरांच्या सत्राचा आकडेवारीनिहाय आढावा घेवून त्यावर अंकूश राखण्यासाठी लवकरच उपाययोजना राबविली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. १ ते १५ जानेवारी दरम्यान शहर आयुक्तालय परिसरातून तब्बल २९ दुचाकी चोरीला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी तत्काळ दखल घेत अधिनस्थ अधिकाऱ्यांना दुचाकी चोरींवर अंकुश ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडेही ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दुचाकीचोरांचे पाळेमुळे खणून काढू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 12:12 AM