कामगारांचा संताप : मृताच्या नातेवाईकांना दिली मदतनांदगाव पेठ : सोफियात काम करणाऱ्या एका मजुराच्या डोक्यावर लोखंडी प्लेट पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने सोमवारी कामगारांनी संताप व्यक्त करुन मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची मागणी केली. या घटनेने सोफियात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सोफिया वीज प्रकल्पाच्या पाचव्या क्रमांकाच्या बॉयलरमध्ये काम करीत असलेला मजुर लखपत जन्नू गोस्वामी याच्या डोक्यावर लोखंडी प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मजुरांवर परिणाम होऊ नये म्हणून या मजुराचा मृतदेह त्याच्या उत्तर प्रदेशातील गावात पाठविण्यात आला. सोफिया प्रशासनाने घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाची वार्ता इतर कामगारांमध्ये पसरली. कामगारांनी सोमवारी एकजुट दाखवून मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी करुन गोंधळ घातला. दरम्यान सोफिया कंपनीने या मृताच्या नातेवाईकांना २० लाख रुपये देऊन तडजोड केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नांदगाव पोलिसांनी पाचारण करण्यात आले होते. सायंकाळ पर्यंत सोफिया वीज प्रकल्पात तणावाची स्थिती होती.
मजुराच्या मृत्यूने सोफियात तणाव
By admin | Published: December 01, 2014 10:46 PM