तिवसा (अमरावती) : राष्ट्रीय महामार्गाने नागपूरवरून अमरावतीला येत असलेला सिलेंडरचा ट्रक मोझरीनजीक शनिवारी सकाळी ११.४५ वाजता उलटला. त्यामध्ये ४०० हून अधिक भरलेले सिलिंडर होते. सुदैवाने चालकाच्या किरकोळ जखमांवर हा अपघात निभावला. काही जणांचा सिलिंडर पळविण्याचा डाव घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हाणून पाडला. नागपूर येथून अमरावतीकडे सिलिंडर घेऊन येणारा एमएच ३१ सी.बी. ७६५१ क्रमांकाच्या ट्रक चालकाला डुलकी आल्याने मोझरीनजीक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रकचालक रंजित रघुनाथ वायरे (३७, रा. जामठा रोड, नागपूर) हा किरकोळ जखमी झाला. हा ट्रक पेट तर घेणार नाही ना, या भीतीपोटी घटनास्थळावरून नागरिकांनी पळ काढला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सिलिंडर पेट घेत असल्याचे निदर्शनास येताच तेथे दाखल झालेल्या तिवसा पोलिसांनी सहकार्य करून पाण्याचा मारा केला आणि स्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला
पोलिसांची सतर्कतासिलिंडरचा भरलेला ट्रक उलटल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. सिलिंडर चोरून नेण्याचा काही जणांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.