अमरावती : जलालखेडा येथून वरूडकडे येत असलेल्या ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. एका जखमीला अमरावती येथे उपचारार्थ पाठवण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनुसार, जिजा रामदास भाकरे (५५, रा. बाभूळखेडा), घनश्याम मौजीलाल साहू (६५, रा. वाठोडा चांदस) अशी मृतांची नावे आहेत. तर, ऑटोरिक्षाचालक विजय कांबळे (३०), सुनील मोरे (४५),नीलोफर सैजत काझी (२६), राजिया शेख अजीज शेख (४८), अजाब मोरे (३५), सीमा सुनील मोरे (३५), बबलू सोनवणे (३२, सर्व रा. आमनेर) अशी जखमींची नावे आहेत.
जलालखेडा येथून वरूडकडे येत असलेल्या ऑटोरिक्षाला (एमएच २७ एसी ८५९०) मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच ३० बीडी १७२६) रोषणखेडा रेल्वे क्रॉसिंगजवळ जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोरिक्षातील चालक फेकला गेल्याने ती विनाचालक ऑटोरिक्षा वेअर हाऊसच्या कुंपणभिंतीला धडकली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, एकाला अमरावती येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.
या ऑटोरिक्षामध्ये आठ ते दहा प्रवासी असल्याची माहिती आहे. घटनास्थळाचा वरूड पोलिसांनी पंचनामा केला. ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात वरूड पोलीस करीत आहेत.