नरेंद्र जावरे
परतवाडा : अमरावती -परतवाडा धारणी-इंदूर या आंतरराज्य महामार्गावर शुक्रवारी रात्री एक वाजतापासून सेमाडोहच्या भवई गावानजीक जत्राडोह येथे अरुंद पुलावर ट्रक अडकल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अमरावती ते मध्यप्रदेशात इंदूर सह इतर ठिकाणी जाण्यासाठी परतवाडा सेमाडोह धारणी खंडवा या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. जड वाहतूक रात्री व दिवसा सतत सुरू राहते. या मार्गाने जाताना मेळघाटातील घाट वळणाचा मार्ग लागतो. यादरम्यान शुक्रवारी रात्री एक वाजतापासून भवई गावाच्या जत्राडोह नजीक मालवाहू ट्रक अडकल्याने दोन्हीकडील वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. यासंदर्भात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तर महामार्ग वाहतूक जिल्हा पोलीससुद्धा पोहोचल्याचे सांगण्यात आले.
अरुंद रस्ते जड वाहतूक नेहमीचा त्रास
चिखलदरा तालुक्याच्या बिहाली ते हरिसाल दरम्यान सर्वाधिक घाट वळण आहे. हा संपूर्ण परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येतो. आंतरराज्य महामार्ग असला तरी अरुंद रस्ता व जड वाहतूक पाहता चालकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत जीव धोक्यात घालून ही वाहतूक सुरू असते. अत्यंत धोकादायक ठिकाणावरील अरुंद पूल मोठे करण्याची गरज या मार्गावर आहे. परंतु व्याघ्र प्रपकल्पाचे जाचक नियम व अटी सुरळीत वाहतूक व काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे.