ठोस पुरावा नाही : मंगरुळपीरचे पोलीस परतले अमरावती : वाशिम जिल्ह्यातून चोरी गेलेल्या ट्रक चोरीचे धागेदोरे अमरावतीत गवसले. मंगरुळपीर येथील पोलीस तपासाकरिता मंगळवारी अमरावतीत आले. त्यांनी संशयीत आरोपींची चौकशी केली आणि परत गेले. मात्र, ट्रक चोरी प्रकरणाचे गूढ अद्यापही कायम आहे. याचप्रकरणात गुन्हे शाखेच्या चार पोलिसांनी आरोपीला माहिती पुरविल्याची बाब पुढे आली असून त्या चार पोलिसांची चौकशी देखील सुरु झाली आहे. मात्र, अद्याप त्या पोलिसांविरुध्द ठोस पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे चारही पोलिसांच्या चौकशीत संभ्रम निर्माण होत आहे. ११ नोव्हेंबर रोजी कारंजा रोडवरील अकोला चौकातील पेट्रोल पंपाजवळून अब्दुल इसाहाक अब्दुल सलाम (५०, रा. मंगरुळपीर) यांचा ट्रक चोरी गेला. त्या ट्रकची अमरावतीत विल्हेवाट लावली जात असल्याच्या माहितीवरून मंगरुळपीर पोलिसांनी अमरावतीमधील गुुन्हे शाखेशी संपर्क केला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकातील चार पोलिसांनी आरोपींशी संगनमत करून ट्रक पळविण्यास मदत केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या चार पोलिसांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ट्रक चोरीप्रकरण, चार पोलिसांच्या चौकशीत संभ्रम
By admin | Published: November 26, 2015 12:20 AM