अमरावती - रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या या सणाचा गोडवा सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. लहानपांसून ते शतकी पार केलेल्या बहिण-भावाच्या राखी बांधण्याचे फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले. बहिण-भावाच्या प्रेमाचे अनेक व्हिडिओही जाहिरातींच्या माध्यमातून दिसले. त्यातच, सोशल मीडियात एका भिकारी महिलेचा आणि घड्याळ विक्रेत्याचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमागील सत्य समोर आलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोसह काही कॅप्शनही देण्यात आले होते. मात्र, आता या फोटोबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. येथील एक वयोवृद्ध भिकारी महिला रस्त्यावर चालत होती. चालत असताना तिची पाऊलं घड्याळाच्या दुकानाकडे वळली. या दुकानासमोर येऊन ती निरीक्षक करू लागली. रस्त्यावरच मांडलेल्या या दुकानातील घड्याळांकडे ती कुतूहलाने पाहात होती. स्टायलिश आणि रंगीबेरंगी घड्याळं, कदाचित तिच्या नशिबात नसतील. या घड्याळ दुकानाच्या मालकांनी तिला पाहिलं. बराचं वेळ हा कुतूहल, उत्सुकतेची पाहणी होत होती.
अखेर मालकाने दुकानातील एक घड्याळ घेतले, त्यानंतर ते घड्याळ त्या गरीब, गरजू महिलेच्या हातावर बांधले. ये ले बहन, मेरी तरफ से ये राखी का तोफा... असे म्हणत दुकानदाराने मनाचा मोठेपणा दाखवला. राखी पौर्णिमेच्यादिवशी हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काहींनी, या फोटोसोबत कॅप्शन देताना, रक्षाबंधनाचं मोल, महत्त्व पटवून दिलं.