वरुड /लोणी : विस्तृत माहितीनुसार, सांवगा येथे बुध्दविहाराच्या जागेचा वाद गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. ४ फेब्रुवारीला किराणा दुकानाची उधारी मागण्यावरुन दोन युवकांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाने रात्री आठ वाजता उग्ररुप धारण केले. गावातील दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर लाठयाकाठयांनी मारहाण सुरू झाली. दरम्यान अजय चौधरी नामक युवकाचे घर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न जमावाने केला. यामुळे परिस्थितीत अधिकच चिघळली. यामध्ये अजय चौधरी यांची आई जखमी झाली. याप्रकरणी प्रफुल्ल भानुदास निंबाळकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे गैरकायदयाची मंडळी जमवून जुन्या वादातून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी किसना शेषराव इखे (४३), विलास नामदेव साबळे (५०), सुरेश महादेव शेकार (३९), महादेव तुकाराम कुरवाळे, योगेश किसना इखे (३०), नरेंद्र नामदेव साबळे (३२ सर्व रा. सांवगा) यांच्या विरुध्द कलम १४३, १४७, ३२४, ४२७,५११, आर.डब्ल्यू.३(१)(१०) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तर नरेंद्र नामदेव साबळे यांच्या तक्रारीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयासमोर सुरु असलेल्या भिंतीच्या बांधकामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरुन काठीने मारुन जखमी केल्याप्रकरणी पुरुषोत्तम श्रीराम निंबाळकर (३८), शंकरराव उकंडराव निंबाळकर (६४), प्रशांत शंकरराव निंबाळकर (३२), प्रफुल्ल भानुदास निंबाळकर (२७), श्रीराम विठोबा निंबाळकर (६८), शशिकांत निंबाळकर (सर्व रा. सावंगा) यांच्या विरुध्द कलम १४३, १४७,३२४,५०४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून नरेंद्र साबळे यांना उपचाराकरिता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रफुल्ल निंबाळकर यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा रामासामी, तहसीलदार राम लंके, नायब तहसीलदार एम.के.असनानी ,वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे, बेनोडाचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, दुय्यम ठाणेदार संतोश बोयणे, कर्मचारी अशोक वाकेकर, प्रकाश तिखीले, केशव चापले आदी तळ ठोकून होते. गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. बुध्द विहाराला सन १९७२ मध्ये ेतत्कालिन उपविभागीय अधिकारी यांनी बुध्द विहाराकरीता ३३ फूट बाय ६४ फूट जागा दिली होती. या जागेच्या वाद अनेक वर्षापासून सुरु असल्याचे सांगण्यात येते. याच वादातून ही घटना घडली. सावंग्यात वरूड, बेनोडा, शेंदूरजनाघाटचे पोलीस पथक तैनात करण्यात आले तर राज्य राखीव दलाची कुमक सुध्दा तैनात करण्यात आली.
घर पेटविण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 05, 2015 11:01 PM