प्रदीप भाकरे
अमरावती : दोघेही परतवाड्याचे, दोघांनीही येथे एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये जुनी ओळख प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. त्या दोघांमधील दृढ प्रेमसंबंधांबाबत त्यांच्या क्लासमेट्सनादेखील माहिती झाले. मात्र, अलीकडे तो तिला मानसिक त्रास देऊ लागला. ‘तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं’! असे म्हणू लागला. त्यामुळे तिने रिलेशनशिप न राहता ब्रेकअपचा निर्णय घेतला. मात्र, तो त्याला रूचला नाही. तो रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरू लागला. मात्र, ती त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळली होती. ती ऐकत नसल्याने त्याने तिला संपविण्याचा आसुरी निर्णय घेतला अन् तिच्या गळ्यावर धारदार कटर चालविले. एका प्रेमकहाणीचा करूण अंत झाला.
एक तरुण युगल रक्तबंबाळ स्थितीत वडुरा गावानजीकच्या नाल्याजवळ रक्तबंबाळ स्थितीत पडले आहे. त्यातील मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास पोलिसांना मिळाली. बडनेराचे ठाणेदार नितीन मगर हे तत्क्षणी घटनास्थळी पोहोचले. खातरजमा केली तथा रक्तबंबाळ स्थितीतील तरुणाला उपचारार्थ, तर तरुणीचे पार्थिवदेखील उत्तरीय तपासणीसाठी इर्विनमध्ये पाठविण्यात आले. त्यापूर्वी दोघांचीही ओळख पटविण्यात आली. संजना शरद वानखडे (१९, रा. विठ्ठलवाडी, कांडली, परतवाडा) असे मृत तरुणीचे तर जखमीचे नाव सोहम ढाले (१९, रा. परतवाडा) असल्याचे स्पष्ट झाले अन् पोलिसांनी तपासाला वायुवेग दिला. तातडीने तपासचक्रे फिरविण्यात आली. दोघांवरही कुणी अज्ञातांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. याशिवाय दोघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, त्यात तरुणीचा मृत्यू झाला असावा, या शक्यतांची पडताळणी करण्यात आली. मात्र, सहा तासांच्या सुयोग्य तपासाअंती दोघांचे प्रेमसंबंध होते, ती त्याच्याशी ब्रेकअप करणार होती, त्या रागातून त्याने तिला संपविल्याचे उघड झाले. स्वत:वरही वार करून घेतल्याचे स्पष्ट झाले. संजनाच्या चुलतभावाची तक्रार व तिच्या रूममेटच्या साक्षीवरून सोहमने तिचा खून केल्याचे उघड झाले.
काय आहे तक्रारीत?
आपली चुलतबहीण येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती. ती साईनगरमध्ये भाड्याने राहत होती. तिने काही दिवसांपूर्वीच आपल्यासह तिच्या वडील व भावाला सोहमच्या मानसिक त्रासाबाबत सांगितले होते. त्यामुळे आपण साईनगर येथे जाऊन त्याला समजावले होते तथा त्याला समजदेखील दिली होती, असे संजनाचा चुलतभाऊ अमित वानखडेे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ब्लॅकमेलिंग अन् मारहाण
संजनाच्या मित्रांनुसार, सोहम संजनाला अत्याधिक मानसिक त्रास द्यायचा. त्यामुळे ती त्याच्यापासून ब्रेकअप करणार होती. मात्र, तो त्यासाठी तयार नव्हता. तो तिला वारंवार ब्लॅकमेल करण्याची, आत्महत्या करून फसविण्याची, तर कधी तिला जिवानिशी मारण्याची धमकी देत होता. तो तिला मारहाणदेखील करत होता, असे उघड झाले आहे.