जितेंद्र दखने, अमरावती: केंद्र सकारने येत्या २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर आरोग्य संस्था, उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे कर्मचारी व अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या समन्वयातून क्षयरोग दूरीकरणासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. यानुसार या उपक्रमात जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवड केली होती. यापैकी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करणाऱ्या ४२ ग्रामपंचायतींनी उकृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे या ४२ ग्रामपंचायत क्षेत्रातून क्षयरोग हद्दपार झाला आहे.
४२ ग्रामपंचायतींनी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करीत गावे टीबीमुक्त केली आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दिलीप सौंदळे यांच्या हस्ते सोमवारी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात ४२ गावांचे सरंपच, सचिव, पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी आदींना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. क्षयरोगमुक्त भारत करण्यावर वरील ग्रामपंचायतींनी भर दिला तसाच इतरही ग्रामपंचायतींनी आपली ग्रामपंचायत टीबीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी कटीयार यांनी केले.
यावेळी सीईओ संजीता मोहपात्रा यांनी आपल्या मनोगतामध्ये क्षयमुक्त ग्रामपंचायती निर्माण करण्यासाठी गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेवका यांना निकषाप्रमाणे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मोहपात्रा यांनी केले. प्रास्ताविक डीएचओ डॉ. सुरेश असोले यांनी केले. तर आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले. कार्यक्रमाला टीएमओ, सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषधाेपचार पर्यवेक्षक उपस्थित होते.
या आहेत टीबीमुक्त ग्रामपंचायती
वासणी खुर्द (अचलपूर), कठोरा गांधी, नया अकोला, (अमरावती) हयापूर, खिरगव्हाण (अंजनगाव सुर्जी), अळणगाव, अंचलवाडी, हरताळा, सायत (भातकुली) खराळा, लाखनवाडी (चांदूर बाजार) बासलापूर, सावंगी संगम (चांदूर रेल्वे), अवागढ, कोरडा, रायपूर,(चिखलदरा), कलमगव्हाण, रामगाव, शिंगणवाडी, ताेंगलाबाद (दर्यापूर), आजनगाव, आसेगाव, बोरवाघल, कसारखेड, रायपूर कसारखेड, सोनेगाव खरडा, उसळगव्हाण, वाढोणा (धामणगाव रेल्वे), धारणमहू, रंगूबेली (धारणी), दुर्गवाडा, मैवाडी, पातूर (मोर्शी), अडगाव बुर्ख, जावरा (नांदगाव खंडेश्वर), भारवाडी, बोरडा, देहाणी, दिवाणखेड (तिवसा), बाभूळखेड, बेसखेडा, इसापूर (वरुड) अशा ४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.