अमरावती : युवकांना शिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांवर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार व सीईओ संजिता महापात्र यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या दमदार कामगिरीने राज्यात अमरावती जिल्हा अव्वल ठरला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ ॲागस्टला महाराष्ट्रात पहिला ॲाफलाइन निवड कॅम्प घेऊन योजनेच्या अंमलबजावणीची जोरदार सुरुवात करण्यात आली. लगेच सीईओ संजिता महापात्र यांच्या पुढाकारात जिल्हा परिषद अंतर्गत सर्व ग्रामपंचायत, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना या प्रत्येक आस्थापनेवर एक प्रशिक्षणार्थी घेण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील तरुणाईला या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे वास्तव आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३३६९ उमेदवार महापालिका, समाज कल्याण, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समाज कल्याण, कोषागार विभाग, पशुसंवर्धन विभाग अशा अनेक शासकीय आस्थापनांमध्ये युवा कार्यप्रशिक्षणार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. शिवाय खाजगी क्षेत्रातही विविध कंपनी, हॅास्पिटल्स व महाविद्यालयामध्येसुद्धा प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या ॲानलाइनमध्ये महाराष्ट्रात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये या विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीमने रात्रंदिवस काम केल्याचे वास्तव आहे.
उमेदवारांना विद्यावेतन (सहा महिन्यांसाठी)बारावी पास : ६००० रुपये, प्रतिमहिनापदविका / आयटीआय : ८००० रुपये, प्रतिमहिनापदवीधर / पदव्युत्तर : १०००० रुपये, प्रतिमहिना
शासकीय, निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या मंजूर पदांच्या ५ टक्के, खाजगी उद्योग, सेवा क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे १० आणि २० टक्के उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतात. या योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून राज्याचे रहिवासी असलेले १८ ते ३५ वयोगटातील विहित शैक्षणिक पात्रता धारण करणारे युवक, युवती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. प्रशिक्षणार्थी उमेदवारास विद्यावेतन मिळत आहे.
"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्ह्यातील ऑनलाइन काम राज्यात अव्वल ठरले आहे. यामध्ये युवक उमेदवारांना कामाच्या प्रशिक्षणासह विद्यावेतन मिळत आहे."- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी.