विधीनुसार पूजाअर्चा : शुक्रवारी सायंकाळी पार पडला सोहळाअमरावती : कारागृह हे बंदी शाळा असून यात सर्वधर्मीय कैदी बंदीस्त आहेत. राष्ट्रीय उत्सवासह सण, धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी कारागृह प्रशासन सतत अग्रस्थानी राहते. याच अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी येथील मध्यवर्ती कारागृहात तुळशी विवाह पार पडला. तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. प्रारंभी फेरी काढून बंदीजनांनी संगीतमय वातावरण निर्माण केले. हलगी वाजत असताना बहुतांश कैद्यांनी नृत्याचा फेर धरला. दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेसोबत तुळशीचा विवाह लावण्यात आला. हा अतुलनीय सोहळा नजरेत कैद करण्यासाठी बंदीजनांनी गर्दी केली होती. बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा या गगनभेदी स्वरांनी कारागृहाचे आसमंत निनादून गेले होते. हिंदू संस्कृतीत तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच तुळश हे गुणकारी औषध म्हणून वापरले जात असून ते आरोग्याशी चांगले आहे. तुळशी विवाह लावताना कैदी बांधवांनी मंगलाष्टके म्हटलेत. यावेळी वातावरण कौटुंबिक झाले होते. जे आपण घरी करू शकलो नाही ते चार भिंतीचा आत करावयाची संधी मिळाल्याने बंदीजनांना हातून कळत- नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित आता खऱ्या अर्थाने झाल्याची भावना अनेक त्यांच्या चेहऱ्यावर मंगलाष्टका म्हणताना उमटल्याचे दिसून आले. या सोहळ्याला कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, मंडळ तुरुंगाधिकारी बी. के. सदांशिव, तुरुंगाधिकारी राजेंद्र ठाकरे, सुभेदार पांडे, महाजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारागृहात लागले तुळशीचे लग्न
By admin | Published: November 12, 2016 12:17 AM