सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी दु:खदायीच : हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती सारखी
गोपाल डहाके
मोर्शी : यावर्षीच्या हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती एकसारखी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेसह अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सन २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटमय ठरल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या परिसरातील शिवारांमध्ये साधारणत: कपाशी, मूग, उडीद, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, ज्वारी यासह पालेभाज्यांमध्ये मिरची, कोबी, कांदा, सांभार, मेथी, पालक, मुळा, वांगे, तर फळांमध्ये संत्रा, मोसंबी, सीताफळ, रामफळ, पपई इत्यादी पिके घेतली जातात. परंतु या हंगामातील सर्वच पिकांवर नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला गेला. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मदार असताना त्यावर दवसदृश स्थिती असल्यामुळे शेतातील उभे पीकच पिवळे पडून वाळू लागले आहे. परिणामी शेतकरी रडकुंडीस आला आहे.
यावर्षीच्या हंगामात संत्रा फळगळतीसह अतिपावसामुळे सुरुवातीचे मुंग व उडीद पीक हातचे गेले. सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने आर्थिक अरिष्ट कोसळले. कपाशीवर बोंडअळी व खोडकिडीचे आक्रमण झाले. दसरा दिवाळीच्या मोसमात ऐनवेळी सोयाबीन या रोखीच्या पिकाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी जेमतेम झाली. त्यानंतर रोखीचे पीक म्हणून कापसावर मदार होती. यावर बोंडअळी व बोंडसडीने आक्रमण केले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून हरभरा पीक घेण्याचा मनसुबा केला. परंतु रबीच्या हरभऱ्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. हरभऱ्याचे पीक सध्या बहरावर आहे. त्यावर मर रोगाचे सावट असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.
बॉक्स
जिरायत व बागायतदार सारखेच
तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांपासून तर बागायतदार व संत्रा उत्पादकांपर्यंत सर्वांची परिस्थिती एकसारखी आहे. संत्र्याचे प्रचंड नुकसान होऊनसुद्धा तालुक्याला संत्रा नुकसानीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. सर्वच पिकांबाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट वर्ष म्हणून २०२० ची नोंद केली जाईल, अशी प्रतिक्रिया जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे.