अमरावती: तुरीचे उत्पादन घटल्याने मागणी वाढती आहे. त्यामुळे भावही दहा हजारांकडे झेपावले आहेत. शुक्रवारी येथील बाजार समितीमध्ये तुरीला पहिल्यांदा उच्चांकी ९७०१ रुपये अधिकतम दर मिळाला. एका दिवसात तूरीच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनीू वाढ झालेली आहे. तुरीचे दर वाढताच तूर डाळीलाही महागाईचा तडका बसला. मॉलमध्ये १५०, तर आता किराणा दुकानात १३५ रुपयांवर पोहोचल्याने ताटातील वरणावर संक्रात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळांत झालेली अतिवृष्टी व जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेला सततचा पाऊस आणि सर्वच तालुक्यांत सरासरी पार झालेल्या पावसामुळे तूर पिकावर मर आली. ५० टक्के क्षेत्रातील तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्या जागच्या जागी सुकल्या. त्यानंतर अतिथंडीने दवाळ जाऊन बहरातील तुरीचे शेंडे जळाले होते. त्यामुळे सरासरी उत्पादन घटले. जिल्ह्यातच नव्हे तर सार्वत्रिक असेच चित्र असल्याने तुरीची आवक घटली व मागणी वाढायला लागली आहे.