अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. आता बारावीचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन चालविले असून, ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. अंतिम निकाल बोर्ड जाहीर करणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण पाठविण्यासाठी शनिवारपासून लिंक खुली करून दिली आहे. दहावीचे ३० गुण, अकरावी ३० गुण, तर बारावीचे ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांना निकालाचे मू्ल्यमापन करून गुण पाठवावे लागणार आहेत. बारावीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी, मौखिक चाचणी, अंतर्गत परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आदींचा आधार घेत कनिष्ठ महाविद्यालयांना मूल्यमापन करून गुण पाठवावे लागतील. कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखांसाठी ही समान नियमावली असणार आहे. बोर्डाने बारावीची परीक्षा घेतली नसली तरी मूल्यमापनात कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असे निकालाचे सत्र ठरविण्यात आले आहे.
विशेषत: गुणी विद्यार्थ्यांची दहावी, अकरावी व बारावीतील क्षमता लक्षात घेऊन कनिष्ठ महाविद्यालयांना निकाल जाहीर करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात बारावीच्या ३५ हजार १४६ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. यात मुले २८ हजार ४०४, तर मुली १६ हजार ७४२ एवढ्या आहेत.
-----------------
असे आहेत बारावीचे विद्यार्थी
शाखा नियमित रिपिटर
विज्ञान १२७७० २७७
कला १२२६२ १०७७
वाणिज्य ३७११ १०७
एमसीव्हीसी ४५०३ ४२२
------------------
कोट
शनिवारपासून बारावीच्या मूल्यमापनास प्रारंभ झाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठविण्यासाठी लिंकदेखील खुली झाली आहे. वस्तुनिष्ठ आधारावर कनिष्ठ महाविद्यालयांना गुण पाठवावे लागणार आहे.
- जयश्री राऊत, सहसचिव, राज्य शिक्षण मंडळ, अमरावती.