- नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : आदिवासी विकास विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या राज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. मिशन शौर्य अंतर्गत सहा विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. या मोहिमेचे नेतृत्व करण्याचा मान सुरगाणा तालुक्यातील हस्ते येथील हेमलता गायकवाड या अकरावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीला मिळाला, हे विशेष.आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेचा सुग्रीव मुंदे व अंकुश विठ्ठल बाभळे, टेंभली येथील शासकीय आश्रमशाळेचा मुन्ना साबूलाल धिकार आणि बिजुधावडी येथील शासकीय आश्रमशाळेचा शिवचरण भिलावेकर या चार विद्यार्थ्यांची निवड गिर्यारोहणासाठी झाली होती. त्यापैकी अंकुश बाभळे हा बेस कॅम्पमध्ये आजारी पडला, तर उर्वरित तीन विद्यार्थ्यांनी राज्यभरातील आपल्या इतर सहा सहकाऱ्यांसोबत ‘मिशन एव्हरेस्ट’ फत्ते केले.याशिवाय अलंगुण (जि. नाशिक) येथील अनुदानित आश्रमशाळेची हेमलता गायकवाड, देवगाव (जि. पालघर) येथील माधवराव काळे आश्रमशाळेचा केतन जाधव, बोरीपाडा (जि. नाशिक) येथील शासकीय आश्रमशाळेचा अनिल कंदे, वाघेरा (जि. नाशिक) येथील अनुदानित आश्रमशाळेचा मनोहर हिलीम, देवाडा (जि. चंद्रपूर) येथील शासकीय आश्रमशाळेचा सूरज आडे, जिवती (जि. चंद्रपूर) येथील शासकीय आश्रमशाळेची अंतुबाई कोटनाके, कापरा (जि. यवतमाळ) येथील शासकीय आश्रमशाळेची सुषमा मोरे यांचाही एव्हरेस्ट सर करणाºया विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. त्यांना नागपूरच्या अविनाश देऊस्कर आणि बिमला नेगी देऊस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे सचिव यूपीएस मदान, प्रधान सचिव मनीषा वर्मा, अपर आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्र, धारणीचे प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.>मिशन शौर्यआदिवासी विभागामार्फत मिशन शौर्य राबविण्यात येते. राज्यातील ९ आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट केले. या प्रकल्पांतर्गत चौघांची निवड झाली होती. एक आजारी पडल्याने तिघांनी सहभाग दर्शविला.- शुशीलकुमार खिल्लारे, प्रकल्प अधिकारी, धारणी
नऊ आदिवासी मुले बनली एव्हरेस्टवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 5:53 AM