वीस महिन्याचा तोंडी करार संपला !
सदस्यांना लागले सभापती-उपसभापतिपदाचे डोहाळे
तिवसा/सूरज दाहाट
तिवसा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसला ऐतिहासिक यश मिळाले. सहा पैकी सहा जागा काँग्रेसने जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी सर्वच सहा जणांना प्रत्येकी २० महिने सभापती व उपसभापतिपद मिळणार, अशी घोषणा करून टाकली होती. आता वीस महिन्यांचा सभापती उपसभापतीचा तोंडी करार संपला. त्यामुळे सदस्यांना पदाचे डोहाळे लागले आहेत.
१५ डिसेंबर २०१९ रोजी तिवसा पंचायत समिती सभापतिपदी शिल्पा हांडे व उपसभापतिपदी शरद वानखडे यांची वर्णी लागली होती. ठरलेल्या तोंडी करारा नुसार १५ ऑगस्ट रोजी शिल्पा हांडे व शरद वानखडे यांचा पदभार संपला. मात्र, अद्यापही हे पदाधिकारी पायउतार झाले नाही. दावेदार असलेल्या कल्पना दिवे व रोहिणी पुनसे या दोन्ही सदस्यांना पदाचे वेध लागले आहेत. या कराराचीही चर्चा होत आहे.