अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून २८ जून २०२२ रोजी तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केले होते. या प्रकरणातील मास्टर माईंड साहील अजमत कालसेकर (३३, नायसी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साहील याला नागपूर कारागृहात जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, गत पाच महिन्यांपासून अन्य दोघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे पसार झालेले दोन आरोपी गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुमित शिवराम धुर्वे (१९), राेशन गंगाराम उईके (२३) रा. बालापेठ, शेदूरजनाघाट, ता. वरूड, जि. अमरावती) अशी पसार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. अमरावती जेल ब्रेक प्रकरणातील मास्टर माईंड साहील याला रत्नागिरी पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सुरक्षेच्या अनुषंगाने साहील याला नागपृूर मध्यवर्ती कारागृहात जेरबंद केले आहे. तथापि, जेल ब्रेक प्रकरणातील दोन पसार आरोपींचा शाेध कोण, कसा लावणार याबाबत पोलीस, कारागृह प्रशासन अनभिज्ञ आहेत. या संदर्भात कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही, हे विशेष.
कारागृहात आठ जणांवर कारवाई
अमरावती ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा तपासाचा अहवाल चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी डीआयजी स्वाती साठे यांना जुलै २०२२ मध्ये साेपविला. ज्या दिवशी ‘जेल ब्रेक’झाले, त्यावेळी कर्तव्यावर असलेले तुरूंगाधिकारी, सुरक्षा रक्षक, अंतर्गत सुरक्षा अधिकारी असे एकृूण आठ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. काही जणांची वेतनवाढ रोखली, तर काहींच्या पदोन्नतीला ब्रेक लावण्यात आल्याची माहिती आहे. कर्तव्यात कसुर केल्याबाबत कारागृहाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, गत पाच महिन्यांपासून दोघे पसार आरोपींचा शोध कधी लागणार, याबाबत प्रशासन ‘ब्र’सुद्धा उच्चारत नाही, हे वास्तव आहे.